जिल्हा परिषद गट-क आरोग्य भरतीचे नवीन वेळापत्रक जाहीर २०२२-२०२३ - Shree Computer Education Gadisurla

Latest

Saturday, October 22, 2022

जिल्हा परिषद गट-क आरोग्य भरतीचे नवीन वेळापत्रक जाहीर २०२२-२०२३

सामान्य प्रशासन विभागाच्या दिनांक १४ मार्च, २०१८ च्या शासन निर्णयास अनुसरुन ग्रामविकास विभागामार्फत राज्यातील सर्व जिल्हा परिषदांतर्गत नामनिर्देशनाच्या कोट्यातील गट-क संवर्गातील रिक्त पदे ‘भरण्याकरिता ऑनलाईन परिक्षा प्रक्रिया राबविण्याबाबतच्या सुचना दिनांक २३ जुलै, २०१८ चा शासन निर्णय व दिनांक १३ फेब्रुवारी, २०१९ च्या शासन शुध्दीपत्रकान्वये देण्यात आल्या होत्या. वित्त विभागाचा दिनांक १६/०५/२०१८ चा शासन निर्णय व दिनांक २८/१२/ २०१८ च्या शासन शुध्दीपत्रकास अनुसरुन सर्व जिल्हा परिषदांकडील गट-क मधील १८ संवर्गातील एकूण १३,५१४ इतकी रिक्त पदे ऑनलाईन पध्दतीने भरण्यासाठी जिल्हा परिषदांमार्फत माहे मार्च, २०१९ मध्ये जाहिरात प्रसिध्द करण्यात आली होती. ही पदे शासनाच्या महाआयटी मार्फत परीक्षा घेऊन भरण्यात येणार होती. दरम्यान लोकसभा व विधानसभा निवडणूक आचारसंहिता तसेच, त्यानंतर महापोर्टल रद्द झाल्याने सदरची परीक्षा होऊ शकली नाही.

कोरोना विषाणु प्रादुर्भावाच्या पार्श्वभुमीवर वित्त विभागाच्या दिनांक ०४ मे, २०२० च्या शासन निर्णयान्वये सार्वजनिक आरोग्य विभाग, वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग वगळता अन्य विभागातील पदभरतीवर निर्बंध घालण्यात आले होते. तथापि, त्यानंतर ग्रामविकास विभागांतर्गत जिल्हा परिषदेतील आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, औषध निर्माता व आरोग्य पर्यवेक्षक ही पदे आरोग्याशी संबंधित असल्याने ती भरण्यास मान्यता देण्यात आली होती.

सामान्य प्रशासन विभागामार्फत सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास (एसईबीसी प्रवर्गातील घटकांना खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्टया दुर्बल घटकाचा लाभ देण्याबातचा शासन निर्णय दि.२३.१२.२०२० रोजी निर्गमित करण्यात आला होता. त्यामुळे सामाजिक व शैक्षणिकदृष्टया मागास (एसईबीसी) प्रवर्गातील जागा अराखीव प्रवर्गात रूपांतरीत झाल्याने माहे मार्च, २०१९ च्या जाहिरातीमधील खुल्या प्रवर्गातील समांतर आरक्षणामध्ये बदल होत आहे.

तसेच, अनुकंपा तत्वावरील नियुक्त्यांचे प्रमाण काही कालावधीसाठी १० टक्के वरून २० टक्के केल्यामुळे व जिल्हा परिषदेने त्याप्रमाणे अनुकंपा भरती प्रक्रिया केल्यामुळे व अन्य कारणांस्तव प्रवर्गनिहाय / समांतर आरक्षणनिहाय जागांमध्ये बदल होत आहे. तसेच, दिव्यांगांच्या नव्याने समाविष्ठ प्रवर्गासाठी व समांतर आरक्षण बदलल्यामुळे नव्याने वाद झालेल्या प्रवर्गासाठी जाहिरात प्रसिध्द करून त्या उमेदवारांनाही संधी देणे आवश्यक आहे.

मार्च २०१९ मधील जाहिरातीतील रिक्त पदांच्या Vacancy Matrix मध्ये SE.B.C. आरक्षण मा. न्यायालयाने रदद केल्यामुळे, कोरोना (कोविड-१९) मुळे, अनुकंपा नियुक्तीच्या पदसंख्येत वाढ केल्यामुळे व अन्य कारणास्तव मार्च २०१९ मध्ये रिक्त असलेल्या व आता सध्या रिक्त असलेल्या पदांत बदल झाले आहेत. आरक्षणात झालेल्या बदलामुळे संबंधित आरक्षण प्रवर्गात त्या संवर्गात जिल्हा परिषदेमध्ये पद शिल्लक नसल्यास उमेदवारांना सामावून घेणे शक्य होणार नाही. त्यामुळे मार्च २०१९ मधील जाहिरातीतील रिक्त पदांच्या Vacancy Matrix मध्ये सर्व जिल्हा परिषदांमधील पदांमध्ये बदल होत असल्याने जुन्याच जाहिरातीनुसार परीक्षा घेणे योग्य होणार नाही.

सामान्य प्रशासन विभागाने त्यांच्या दि. ४ मे २०२२ च्या मार्गदर्शक सूचनांस अनुसरून मार्च, २०१९ महाभरती अंतर्गत ग्रामविकास विभागाच्या अखत्यारीतील जिल्हा परिषद अंतर्गत गट-क संवर्गाच्या पदभरतीबाबत दि. १० मे २०२२ च्या शासन निर्णयान्वये मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्यात आल्या होत्या. त्यानुसार जिल्हा परिषदेच्या अखत्यारितील सर्व रिक्त पदे यापूढे सर्व जिल्हा परिषदांनी पूर्वीप्रमाणेच जिल्हा निवड मंडळामार्फत जिल्हा परिषदेच्या स्तरावरच मरण्यास शासनाची मान्यता देण्यात आलेली होती..

राज्यस्तरावरून होणारी परीक्षा, बदललेल्या परिस्थितीनुसार जिल्हा स्तरावरून घ्यावी लागणार आहे. त्यामुळे यासंदर्भात जिल्हा परिषदांसोबत चर्चा केली असता असे निदर्शनास आले की, पूर्वी नेमलेल्या सामायिक कंपनीकडून हस्तांतरित झालेल्या उमेदवारांच्या माहिती (data) मध्ये त्रुटी असून काही उमेदवारांचे आरक्षण प्रवर्ग चुकल्याचे निदर्शनास आले आहे. तसेच सदर माहिती (data) ही क्लिष्ट स्वरुपाची व अचर्गीकृत असल्याने कोणत्या उमेदवाराने कोण-कोणत्या संवर्गासाठी कोण-कोणत्या जिल्ह्यात अर्ज भरले आहेत, याची स्पष्टता होत नसल्याचे जिल्हा परिषदानी निदर्शनास आणून दिले होते..

सबब, उपरोक्त सर्व अडचणीमुळे माहे मार्च, २०१९ च्या जाहिरातीनुसार घेण्यात येणारी परीक्षा रद्द करण्यात येवून, जिल्हा परिषद स्तरावर नव्याने परीक्षा घेण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

जिल्हा परिषद आरोग्य विभागाशी संबंधित गट-क संवर्गातील भरतीची प्रक्रियेबाबत शासनाचा नवीन निर्णय २०२२-२०२३:

मार्च, २०१९ महाभरती अंतर्गत ग्रामविकास विभागाच्या अखत्यारीतील जिल्हा परिषद अंतर्गत गट-क पदभरतीबाबत खालीलप्रमाणे निर्णय घेण्यात येत आहे.

मार्च, २०१९ व माहे ऑगस्ट, २०२१ (अपंग व इतर सुधारित आरक्षणासह) महाभरती अंतर्गत ग्रामविकास विभागाच्या अखत्यारीतील जिल्हा परिषद अंतर्गत गट-क मधील १८ संवर्गाची सर्व जाहिरात, परीक्षा व संपूर्ण भरती प्रक्रिया याद्वारे रद्द करण्यात येत आहे. सदर पदभरती रद्द झाल्यामुळे या जाहिरातीनुसार सर्व उमेदवारांनी अर्जापोटी ‘भरलेले परीक्षा शुल्क त्यांना संबंधित जिल्हा परिषदांमार्फत परत करण्यात येईल. उमेदवारांना परीक्षा शुल्काच्या परत करावयाच्या कार्यपद्धतीबाबत जिल्हा परिषदांना स्वतंत्रपणे कळविण्यात येईल.


जिल्हा परिषदांतील आरोग्य विभागाशी संबधीत आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, औषध निर्माता, आरोग्य पर्यवेक्षक या ५ संवर्गातील रिक्त पदे संवर्गनिहाय आरक्षण नियमानुसार निश्चित करून जिल्हा परिषदांनी त्यांच्या स्तरावर जिल्हा निवड मंडळामार्फत भरण्याबाबत सुधारित कालबद्ध कार्यक्रम (परीक्षेचे संभाव्य वेळापत्रक) निश्चित करण्यात येवून प्रपत्र- १ मध्ये जोडण्यात आले आहे. सदर कालबद्ध कार्यक्रमाचे सर्व जिल्हा परिषदांनी तंतोतंत पालन करावे. त्याकरिता रिक्त पदे, त्यांची आरक्षण निश्चिती, नव्याने उमेदवारी अर्ज मागविणे, सदर परीक्षेच्या आयोजनासाठी कंपनी निवडणे (आवश्यक असल्यास), परीक्षा घेणे (ऑनलाइन / ऑफलाइन) इ. तदनुषंगिक परीक्षा घेण्यासंबंधीची सर्व जबाबदारी ही जिल्हा निवड मंडळाची व जिल्हा परिषदेची राहील.


जिल्हा परिषदांतील आरोग्य विभागाशी संबंधित वर नमूद ५ संवर्गाची पदे वगळता इतर संवर्गातील पदभरतीची कार्यवाही वित्त विभागाच्या दि.३० सप्टेंबर २०२२ च्या शासन निर्णयातील निर्देशानुसार जिल्हा परिषद/पंचायत समितीसाठी सुधारित आकृतिबंधास शासनाची मंजूरी मिळाल्यानंतर जिल्हा परिषदेमार्फत करण्यात यावी.


माहे मार्च, २०१९ च्या जाहिरातीप्रमाणे ज्या उमेदवारांनी यापूर्वी अर्ज केलेले/भरलेले आहेत, व सध्या वयाधिक्य झाले असल्याने ते परीक्षेस बसण्यास अपात्र होऊन अशा उमेदवारांचे नुकसान होऊ नये, याकरिता अशा उमेदवारांचे अर्ज स्वीकारून पुढील फक्त एका परीक्षेस बसण्याकरिता अशा उमेदवारांना वयोमर्यादेत सूट देण्यात येत आहे. तसेच, मार्च, २०१९ च्या जाहिरातीप्रमाणे सदर पदासाठी असलेली शैक्षणिक अर्हता ही पुढील फक्त एका परीक्षेसाठी कायम राहील.

जिल्हा परिषद गट-क आरोग्य भरतीचे नवीन वेळापत्रक जाहीर २०२२-२०२३ – Health Department Recruitment:


अ.क्र. कार्यक्रम कालावधी दिनांक

1 बिंदू नामावली अंतिम करणे, रिक्त पदांची संवर्गनिहाय आरक्षण निश्चिती करणे, कंपनीची निवड करणे आवश्यक असल्यास) व तदनुषंगिक सर्व कामे करणे ०२ आठवडे ३१ डिसेंबर २०२२ पर्यंत.

2 पदभरती जाहिरात प्रसिद्ध करणे ०१ आठवडा ०१ ते ०७ जानेवारी, २०२३

3 उमेदवारांचे अर्ज मागविणे 15 दिवस ०८ ते २२ जानेवारी, २०२३

4 पात्र उमेदवारांची यादी जाहीर करणे ३ दिवस ३१ जानेवारी ते ०२ फेब्रुवारी, २०२३

5 जिल्हा परिषद व जिल्हा निवड समितीने / मंडळाने प्रत्यक्ष परिक्षेच्या आयोजनासंदर्भात कार्यवाही करणे ०१ महिना ०३ फेब्रुवारी, २०२२ ते ०३ मार्च, २०२३

6 पात्र उमेदवारांचे प्रवेशपत्र तयार करून संबंधित उमेदवारांना उपलब्ध करून देणे ०१ आठवडा ०४ ते ११ मार्च, २०२३

7 परिक्षेचे आयोजन (ऑनलाईन / ऑफलाईन पद्धतीने) आरोग्य पर्यवेक्षक (सकाळी ११.०० ते ०१.०० वाजता) – औषध निर्माता (दुपारी ०३.०० ते ०५.०० वाजता )आरोग्य सेवक (पुरुष), आरोग्य सेविका ( सकाळी ११.२० ते ०१.०० वाजता)

प्रयोगशाळा तंत्रज्ञ (दुपारी ०३.०० ते ०५.०० वाजता)


०२ दिवस २५ मार्च २०२३२६ मार्च २०२३

8 अंतिम निकाल जाहीर करणे व पात्र उमेदवारांना नियुक्ती आदेश देणे ०१ महिना २७ मार्च ते २७ एप्रिल २०२३

ग्राम विकास विभाग शासन निर्णय: माहे मार्च, 2019 च्या जाहिरातीनुसार जिल्हा परिषदेच्या अखत्यारितील गट-क संवर्गातील सर्व पदे भरण्याबाबत शासन निर्णय पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.