एका विज्ञानाच्या वर्गात झालेला किस्सा .. - Shree Computer Education Gadisurla

Latest

Monday, September 14, 2020

एका विज्ञानाच्या वर्गात झालेला किस्सा ..

 

शिक्षकांचं वर्गात आगमन होताच वर्गातला गोंधळ गोंगाट  एकदम शांत झाला .   आज सरांनी आपल्या सोबत काहीतरी प्रयोगाचं सामान आणलं होतं . 


 मुलं कुतुहलानी सरांनी आणलेली झाडाची फांदी आणि त्यावर असलेला फुलपाखराचा कोष बघायला लागले.  सरांनी आपला वर्ग सुरू केला, 

                    " फुलपाखराचे जीवन चक्र "


 शिक्षकांचं शिकवणं सुरु झालं होतं , पण मुलांचं सगळं लक्ष त्या कोषाकडे होतं . त्यातलं फुलपाखरु नुकतच त्या कोषातुन बाहेर पडायच्या मार्गावर होतं . ते फुलपाखरु त्या बंद कोषातुन बाहेर पडायला झटत  होतं.  त्याची ती धडपड ,वेदना सगळी मुलं अगदी बारकाईनं बघत होते . 


  तितक्यात वर्गात परिचराने येऊन सांगितलं ..

," सर , तुम्हाला प्रिंन्सीपल सरांनी ताबडतोब बोलावलंय ऑफीसात .."


    शिकवणं थांबवुन सर वर्गाकडे उद्देशुन म्हणाले  ," मुलांनो , मी जरा भेटुन येतो सरांना.

 पण एक गोष्ट लक्षात ठेवायची , फुलपाखरु कितीही त्रासात आहे  असं वाटलं,  तरिही ते त्याच्याच चांगल्यासाठी असणार आहे , तेव्हा तुम्ही त्याला कुठल्याही प्रकारची मदत करु नका. तुमची मदत त्याला हानीकारक होऊ शकते . "


  शिक्षक निघुन गेले . 

जसा सरांचा पाय वर्गाबाहेर पडला तशी सगळी मुलं पटापट येऊन त्या टेबला भोवती जमा झाले . आणि त्याची ती लांबुन दिसणारी धडपड जवळुन पाहु लागले .

 

आता  त्यांच्यात चर्चा मोठ्यानं सुरु झाली होती .

 " ये बघ ना त्याला कीती त्रास होतोय "

"अरे त्याच्या कोषाला थोडासा बाजुला कर ना ."

" बापरे , कीती दुखत असेल त्याला  "

" काही होणार नाही त्याला , काढ तो कोष बाजुला ,"

 

 अशातच एका मुलाने पटकन हात समोर केला ,आणि कोष बाजुला केला ..


  मुलांच्या अपेक्षेप्रमाणे फुलपाखराने पटापट पंख पसरुन उडुन जायला हवे होते .. 

पण ते तसे न होता भलतेच झाले ....

 फुलपाखराने पंख पसरवले पण ते नीट उघडल्या गेले नाही ,आणि त्यामुळे त्या फुलपाखराला नीट उडताही आले नाही .....दुसर्याच क्षणी ते कोलमडुन पडले .....


  मुलं घाबरली ,, आता आपल्याला रागावणार सर ,,,

शांत पणे जागेवर जाऊन बसली ..

  

  सर परत आले ...

वर्गात आपल्या गैरहजेरीत वर्ग इतका शांत बघुन त्यांना शंका आलीच की काहीतरी गडबड आहे . उत्तर समोरच दिसलं  ...


   फुलपाखरु अर्धमेलं होऊन पडलेलं होतं ...


 शिक्षकांनी त्यात जास्त विचारपुस न करता एका वेगळ्याच रितीने मुलांना धडा दिला ..ते म्हणाले ...


     "  मुलांनो ,,जर तुम्ही फुलपाखराला त्याच्या स्वत:च्या  बळावर पंख पसरवु दिले असते तर आज ते उडायला सक्षम झाले असते ,, कारण ते कष्ट , त्या यातना त्याला ती सशक्तता देऊन जातात ज्यामुळे त्याला पुढंच जीवन जगायचं बळ मिळत जात असतं , जर त्याला ते आयतं मिळत गेलं तर त्याला स्वत:हुन जीवनातल्या बारिकसारीक गोष्टीही करता येत नाहीत ज्या की जगायला अत्यावश्यक असतात.


      आयष्यात सगळंच एकसारखं , सोप्प , सुंदर , मनाजोगं मिळेलच असं नाही , ते मिळालं नाही म्हणुनची निराशा मनात बाळगुन उदास होण्या पेक्षा त्यातुन मार्ग काढणं शिकायला हवं .

 जीवनातले  कष्ट  हे सुद्धा एकप्रकारचे जीवनामृतच आहे .  "

 

     ही गोष्ट मी कधीतरी ऐकलेली आहे , शब्दात मांडायचा प्रयत्न केलाय .....

पण एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते ,,

      की मुलांना आज आपण जे संगोपन देतोय ते काहीसं अशाच प्रकारचं आहे .. 


  सुरक्षितता आणि सुखसोई द्यायच्या नादात आपण त्यांचा कोष हातानेच काढु बघतोय .  बाहेरच्या जगात वावरताना मुलांना जी हुशारी ,जी समयसुचकता , जो संयम  हवा आहे तो मुलांमधे कमी आढळतो . त्यामुळेच की काय मुलं थोडाश्या निराशेनी , अपयशाने खचुन जातात . 

सगळ्या वस्तु त्यांना सहज उपलब्ध झाल्याने त्यांना वस्तुंची किंमतही उरत नाही .

 

 प्रत्येक वेळी एक आधारस्तंभ म्हणुन आपण त्यांच्या मागे आहोतच पण प्रत्येक क्षणी त्याच्या सोबत आपलं  राहणं अशक्य आहे . 


  म्हणुन मुलांना त्यांच्या कोषातुन स्वत:च बाहेर पडु द्यावं . त्रास होईल पण तो हिताचा राहील त्यांच्याचसाठी .  

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.